कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कणकवली ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (BRC) तसेच माती परीक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन डामरे (साटमवाडी), ता. कणकवली येथे उत्साहात संपन्न झाले. सदर भूमिपूजन जमीन मालक शाहू विष्णू साटम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे म्हणाले की, “डामरे गाव कणकवली तालुक्याचे केंद्रबिंदू ठरत असून या भागातून सेंद्रिय शेतीसाठी महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात होत आहे, ही अभिमानाची बाब आहे.”
तर तालुका कृषि अधिकारी ओहोळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “कणकवली तालुक्यातील पहिला नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभिनव उपक्रम म्हणून हा प्रकल्प उभारला जात आहे. तालुका कृषि अधिकारी म्हणून हा उपक्रम आमच्या तालुक्यात सुरू होत आहे, ही माझ्यासाठी भूषणावह बाब आहे.”
यावेळी पंचायत समिती सदस्य बबलू सावंत यांनी बोलताना सांगितले की, शासनाच्या सिंधू रत्न समृद्ध योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू तसेच पाण्याची व्यवस्था देखील शासनाच्या योजनेतून करण्यात येईल.
यावर जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेकडून लागणारी सर्व आवश्यक मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास कृषि विभागीय अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषि अधिकारी श्री. ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, पंचायत समिती सदस्य बबलू सावंत यांची उपस्थिती लाभली. तसेच पोलीस पाटील विश्वास सावंत, भास्कर सावंत, अभी सावंत, सुहास सावंत, संतोष साटम, सुभाष सावंत, विजय सावंत, प्रसाद सावंत तसेच फोंडाघाट सोसायटीचे चेअरमन राजन नानचे यांसह कंपनीचे संचालक महेंद्र राणे, श्रीकांत राणे, सागर साटम, चंद्रकांत गुरव, समीर राऊत यांसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान राणे यांनी केले. प्रास्ताविक कंपनीचे संचालक दत्तकुमार सामंत व आबू पटेल यांनी केले, तर आभार प्रदर्शन अध्यक्ष अलंकार रावराणे यांनी केले.












