फोंडाघाट महाविद्यालयात मोफत महा आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ! ३८५ रुग्णांची तपासणी व उपचार

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट मध्ये डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, कोल्हापूर यांच्या सहकार्याने, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, फोंडाघाट व पंचक्रोशीतील महिलांसाठी मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना व सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत आयोजित या शिबिरात ३८५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या शिबिरात मेडिसिन, सर्जरी व मूत्ररोग, अस्थिरोग, नेत्ररोग, फिजिओथेरपी, कर्करोग, स्थूलता विकार, आदी विभागांतील १६ तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून तपासणी केली. सर्व रुग्णांना आवश्यक औषधेही मोफत देण्यात आली. पुढील उपचार अथवा शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची प्राथमिक आरोग्य तपासणीही करण्यात आली.

शिबिराच्या उद्घाटक सिनियर डॉक्टर अनुश्री कोग्रेकर यांनी महिलांमध्ये आढळणारे विविध आजार, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, तसेच नियमित आरोग्य तपासण्यांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. तसेच शिबिराच्या जनसंपर्क अधिकारी मेघा सावंत यांनी शिबिरात करण्यात येणाऱ्या विविध तपासण्या व त्याचा महिलांना होणारा फायदा याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत या आरोग्य शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, तसेच फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. यादव उपस्थित होते. याशिवाय फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक रंजन नेरूरकर, संदेश सावंत व सुभाष सावंत यांनी उपस्थित राहून शिबिरास सदिच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी केले.

या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवक व एनसीसी कॅडेट्स यांनी शिबिराची व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळली.फोंडाघाट व पंचक्रोशीतील महिलांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!