सिंधुसरस प्रदर्शनातून ब्रँडेड वस्तू उत्पादक बचतगटांना बाजारपेठ – प्रमोद कामत

२१ ते २३ मार्च दरम्यान कुडाळमध्ये प्रदर्शन

ओरोस (प्रतिनिधी) : ब्रँडेड उत्पादन घेत असलेल्या जिल्ह्यातील बचतगट समूहांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने २१ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस तथा मिनी सरस २०२६ प्रदर्शनाचे आयोजन कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले आहे.

याबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्ष दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार आदी उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन २१ रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री नितेश राणे, खा नारायण राणे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष कामत यांच्याहस्ते होणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती आ दीपक केसरकर, आ निलेश राणे, आ निरंजन डावखरे, आ ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांची लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, प्रकल्प संचालक डॉ उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार उपस्थित राहणार असल्याचे अध्यक्ष कामत यांनी सांगितले.

जिल्हा ग्रामीण यंत्रणा आणि उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. विविध खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन यांचाही यात समावेश राहणार आहे. जिल्ह्यातील १६ स्वयंसहाय्यता महिला समूह चविष्ट खाद्यपदार्थ स्टॉल उभारणार आहेत. जिल्हा बँक आणि आरोग्य यासाठी प्रत्येकी एक स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तसेच बांबूपासून उत्पादने, लाकडी उत्पादने, कोकणी मेवा उत्पादने इत्यादी प्रकारचे ५९ स्टॉल असणार आहेत. या शिवाय दररोज पैठणी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मनोरंजनात्मक उपक्रमांचा भरणा यात राहणार आहे. शेतकरी, पशुपालक यांच्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असल्याचे अध्यक्ष कामत यांनी सांगितले.

२१ ते २५ मार्च या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. २१ रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार असून दुपारी ३ वाजता पैठणी स्पर्धा रंगणार आहे. सायंकाळी ४ वाजता डॉग शो होणार आहे. सायंकाळी ७ नंतर देवगड किंजवडे येथील समई नृत्य होणार आहे. २२ रोजी सकाळी ११ वाजता पशु, कृषी मेळावा होणार आहे. दुपारी ३ वाजता पैठणी स्पर्धा रंगणार आहे. सायंकाळी ४ वाजता बाळूमामा यांच्यावर आधारित ट्रिकसीन नाटक होणार आहे. सायंकाळी ७ नंतर पाककला स्पर्धा होणार आहे. २३ रोजी सकाळी ११ वाजता बँक वर्कशॉप होणार आहे. दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत विभागाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता पैठणी स्पर्धा रंगणार आहे. सायंकाळी ४ वाजता महिला ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ७ नंतर कुडाळ येथील चिमणी पाखरे ग्रुपचा डान्स होणार आहे. २४ रोजी सकाळी ११ वाजता महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता पैठणी स्पर्धा रंगणार आहे. सायंकाळी ४ वाजता कळसूत्री खेळ होणार आहे. सायंकाळी ७ नंतर रंगी रंगला महाराष्ट्र हा कार्यक्रम होणार आहे. २५ रोजी बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम होणार आहे. पैठणी स्पर्धा या सी आर पी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे.

error: Content is protected !!