कणकवलीत राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतील त्रुटींवर तात्काळ दुरुस्तीची मागणी

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सावंतवाडी यांचे वेधले लक्ष

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग फ्लायओव्हर व सर्विस रोडवरील विविध समस्यांबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

नगरपंचायत हद्दीतून सुमारे १८०० मीटर लांबीचा फ्लायओव्हर व दोन्ही बाजूंनी सर्विस रोड बांधण्यात आले आहेत. मात्र सध्या या ठिकाणी अनेक त्रुटी निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत असल्याचे पारकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. महामार्गावरील राईट ऑफ वे (ROW) चे मार्किंग स्पष्ट नसल्याने संभ्रम निर्माण झाला असून ते पुन्हा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी व आवश्यक त्या ठिकाणी स्पीडब्रेकर बसवावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

फ्लायओव्हरचे कॉलम व सिमेंट गर्डरचे रंगकाम खराब झाल्याने त्यांची रंगरंगोटी करावी, तसेच अंडरपास व जोडरस्त्यांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने तेथे पथदीप बसविण्याची गरज आहे, तसेच पावसाळ्यात पाण्याचा निचरा, पुलावरून पडणारे पाणी याबाबत समस्या असल्याचे पारकर यांनी अधोरेखित केले आहे.

याशिवाय शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये कचरा साचल्याने दुर्गंधी व पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असून नाल्यांची तात्काळ साफसफाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्विस रोडलगतच्या गटारांचीही स्वच्छता करावी, असे निवेदनात नमूद आहे.

नरडवे रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आप्पासाहेब पटवर्धन चौक आदी ठिकाणी नामफलक लावणे, तसेच अंडरपास व जोडरस्त्यांवर बहिर्वक्र आरसे बसविणे आवश्यक असल्याचेही पारकर यांनी सांगितले आहे.

फ्लायओव्हरवरील अपुरी पथदीप व्यवस्था ही गंभीर बाब असून अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे नवीन पथदीप बसवून बंद दिवे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. वरील सर्व समस्यांवर पावसाळ्यापूर्वी तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे पारकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!