सोनाळी नदीपात्रात मृतावस्थेत आढळला होता कामगार
व्हायरल व्हिडीओमुळे कामगाराचा खून तर झाला नसेल ना ? संशय व्यक्त
वैभववाडीह(प्रतिनिधी) : दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या कामगाराचा मृतदेह नदीपात्रात सापडतो. आकस्मिक मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंदही होते. मात्र अचानक त्या मृत कामगाराला बेदम मारहाण करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि प्रश्न निर्माण होतो की तो मृत कामगार पाण्यात बुडून मेला होता की झालेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आणि नंतर त्याचा मृतदेह नदीपात्रात टाकण्यात आला होता ? त्या कामगाराच्या बाबतीत अपघात झाला की त्याचा घात झालाय ? वैभववाडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेला आता आकस्मिक मृत्यूवरून खूनाच्या घटनेकडे वळण मिळू लागले आहे. त्या मृत कामगाराला मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत वैभववाडी पोलिसांकडून चौकशी सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. त्या व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत असून त्याच्यासोबत आणखी किमान दोघेजण असल्याचा संशय व्हिडिओमधील संभाषणातून व्यक्त होतोय.
राकेश केतन मांझी (वय २५, रा. गोपाळगंज, बिहार) या सेंटरिंग काम करणाऱ्या कामगाराचा सोनाळी गावातील शुक नदीपात्रात मृतदेह आढळून आला होता. ही घटना 27 मार्च रोजी उघडकीस आली होती. राकेश केतन मांझी हा त्याचा मृतदेह सापडण्याआधी दोन दिवसांपासून बेपत्ता होता. वैभववाडी पोलिसांनी पाण्यात बुडून मृत्यू झाला असे प्रथमदर्शनी दिसत असल्यामुळे आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता.
नापणे येथे सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामासाठी बिहारमधून आलेल्या कामगारांमध्ये राकेश मांझी याचा समावेश होता. तो मागील तीन महिन्यांपासून येथे काम करत होता. बुधवारी वैभववाडी शहरातील आठवडा बाजारासाठी तो गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो नापणे येथील वास्तव्यास परतला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सहकारी कामगारांनी त्याचा शोध सुरू केला, परंतु तो सापडला नाही.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सोनाळी नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती येथील पोलीस पाटील राजेंद्र रावराणे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सहकारी कामगारांनी मृतदेहाची ओळख राकेश मांझी अशी पटवली. ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता.आता मृत राकेश मांझी ला जबर मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाचा वेगळे वळण लागले आहे.












