सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी .या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आज पासून जिल्हा परिषद समोर साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक ३१ जुलै २०२४, ६ऑगस्ट २०२४, व १२ऑगस्ट २०२४ च्या पत्रांन्यये सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १ नोव्हेंबर २००५ च्या पद भरती जाहिरातीनुसार शासन सेवेत १नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील माहिती सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७३ शिक्षक संवर्गातील कर्मचारी व ६ विस्तार अधिकारी संवर्गातील कर्मचारी त्यांच्यासाठी येणारा अंदाजीत खर्च याबाबत ग्राम विकास विभागाला २३ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने १नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत १ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनकडून १० ऑक्टोबर २०२४ रोजी विहित वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार पात्र प्राथमिक शिक्षकानी प्रस्ताव सादर केलेले आहेत. असे असतानाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शासन निर्देशानुसार विहित वेळेत कार्यवाही न केल्याने संबंधित पात्र कर्मचारी जुनी पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही शिक्षण विभागाकडून सदर कार्यवाही करण्यास जाणीवपूर्वक विलंब करण्यात येत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने संघटनेचे राज्याध्यक्ष प्रवीण पाताडे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून जिल्हा परिषदेसमोर साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात शिक्षकांच्या विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला असून या आंदोलनात विविध संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये राजन कोरगावकर, म ल देसाई ,शशांक आरोदेकर ,नारायण नाईक, चंद्रसेन पाताडे आदी संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
या आंदोलनाला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रितेश राऊळ तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब यांनी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षण अधिकारी परब यांनी आपण याबाबत सकारात्मक असून आपल्याला जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत अर्जांची छाननी करून हा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल त्यासाठी काही अवधी द्यावा अशी विनंती केली तर सभापती प्रितेश राऊळ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश असल्याने जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याबाबत आढावा घेण्यात आला आहे लवकरच हा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही दिली जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी आपल्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून आपल्याला या प्रश्नासाठी पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही अशी आम्ही दिली तरी तूर्तास हे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली तर संघटनेचे राज्याध्यक्ष प्रवीण पाताडे यांनी हे आंदोलन सर्व शिक्षक संघटनांच्या पाठिंबामुळे केले आहे त्यांच्याशी चर्चा करून व आपला मान राखून स्थगित करण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले.











