वैभववाडी (प्रतिनिधी) : नेर्ले येथील श्री देव धावजी देवस्थानच्या होळी उत्सवादरम्यान लागू करण्यात आलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत गावातील महिलांनी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संबंधितांवर गुन्हा नोंद होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम आणि आक्रमक पवित्रा महिलांनी घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. नेर्ले गावात होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांच्या अहवालावरून तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी 27 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत बंदी आदेश लागू केला होता. मात्र हा आदेश अस्तित्वात असतानाही 7 मार्च रोजी गावातील दोघांनी देवस्थान मध्ये प्रवेश केल्याचा आरोप नीलम नवनाथ पांचाळ आणि आरती भालचंद्र सुर्वे यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी 16 मार्च रोजी तहसीलदार व वैभववाडी पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत सोमवारी सकाळपासून सौ. पांचाळ, सौ. सुर्वे यांच्यासह गावातील अन्य महिलांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. तहसीलदार सूर्यकांत पाटील व पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी उपोषणकर्त्या महिलांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र “गुन्हा नोंद झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका महिलांनी घेतल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत उपोषण सुरूच होते.
नेर्लेतील महिलांचे तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण;बंदी आदेश भंग करणाऱ्यांवर कारवाईची ठाम मागणी…












