कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हयातील एका माध्यमिक विद्यालयात प्र. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या हिंदुराव सदाशिव सुतार या शिक्षकाने क्रिडा प्रकार शिकविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजारांचा सशर्थ जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपी प्र. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना शाळेतील मुलांना इंग्रजी व शारिरीक शिक्षण शिकवत असे. शारिरीक शिक्षणामध्ये पाठाचेवेळी विद्यार्थीनींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी कृत्ये वारंवार घडली. याबाबत विद्यार्थीनींनी वेळोवेळी पालकांजवळ तक्रारी केल्या होत्या. तसेच इंग्रजी शिकविण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनींना कार्यालयात बोलावून घेणे व त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन करण्याचे प्रकार घडले होते. काही विद्यार्थीनीनी शारिरीक शिक्षण तास नाकारला होता. यावरून आरोपीने त्यांना अश्लिल शिवीगाळही केली होती. त्यापैकी एका विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध भा.न्या.सं. ७४, ७५, ७९, ३५२ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
आरोपीच्या जामिन अर्जावर झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने विद्यार्थीनींशी पुन्हा संपर्क ठेऊ नये, सरकारी तपासात ढवळाढवळ करू नये, आदी अटींवर जामिन मंजूर करण्यात आला आहे.








