जायबंदी मजूर कामगाराला केली आर्थिक मदत

हनुमंत तळेकर, शशांक तळेकर, अविनाश वाडये यांनी जपला माणुसकीधर्म

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे सरपंच हनुमंत तळेकर व त्यांच्या मित्रांनी हातावर पोट असणाऱ्या मजूरकामगाराला संकटकाळी आर्थिक मदत देऊन माणुसकी धर्म जपून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. निलेश कांजीर हा रोज मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढणारा एक साधा, कष्टकरी माणूस. पण काही दिवसांपूर्वी नियतीनेच त्यांच्यावर घाला घातला… काम करत असताना ते घरावरून खाली कोसळले आणि त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. एका क्षणात कष्टावर उभा असलेला संसार अडचणीत सापडला, आणि कुटुंबावर संकटाचे सावट दाटून आले. ही बातमी समजताच तळेरे गावाने माणुसकीची उब दाखवली. सरपंच हनुमंत तळेकर, माजी सरपंच शशांक तळेकर तसेच अविनाश वाडये आणि राजेश जाधव यांनी कोणतीही विलंब न करता त्यांच्या घरी धाव घेतली. त्यांनी केवळ विचारपूस केली नाही, तर संकटात खचलेल्या कुटुंबाला धीर देत “आम्ही तुमच्यासोबत आहोत” हा विश्वास दिला. या कठीण प्रसंगी मदतीचा हात पुढे करत सरपंच हनुमंत तळेकर यांनी रु. 5000/- तर अविनाश वाडये यांनी रु. 1000/- ची आर्थिक मदत स्वयम हनुमंत तळेकर यांच्या हस्ते सुपूर्द केली. ही रक्कम कदाचित मोठी नसली, तरी तिच्यामागील माणुसकी, आपुलकी आणि सहानुभूती अमूल्य आहे. संकटाच्या काळात दिलेला हा आधार केवळ आर्थिक मदत नाही, तर जिवंत नात्यांची, सामाजिक जबाबदारीची आणि एकजुटीची साक्ष आहे. तळेरे गावाने पुन्हा एकदा दाखवून दिले — माणूसकी अजूनही जिवंत आहे… आणि संकटात तीच सर्वात मोठी ताकद ठरते.

error: Content is protected !!