सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद कृषी विभागाच्या जिल्हा परिषद सेस मधून सन २०२६- २७ साठी सुधारित एक कोटी ८८ लाख ६८ हजारच्या अंदाजपत्रकास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली तर काही शेती विषयक योजना नव्याने तयार करण्याबाबत कृषी समिती सभेत निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषद कृषी समितीची सभा कृषी सभापती तथा उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या दालनात संपन्न झाली. या सभेत समिती सचिव दिशांत कोळप, समिती सदस्य अयंगो डिसोजा, पार्वती गवस, शंकर घारे ,विक्रांत सावंत, सुयोगी घाडी, सुजाता पडवळ ,संदीप गावडे, आदींसह कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद कृषी समितीची पहिलीच सभा नवनिर्वाचित सभापती तसेच सदस्यांच्या उपस्थितीत आज झाली. यावेळी सर्व सदस्यांसह सभापतीचे कृषी विभागामार्फत दिशांत कोळप यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आजच्या पहिल्या सभेत सदस्यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांवर चर्चा करत योजना समजून घेतल्या. तर कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये काही बदल सुचविले. कृषी विभाग मार्फत आजच्या सभेत जिल्हा परिषद सेस सन २०२६- २७ साठी सुधारित अंदाजपत्रक मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. यावर प्रत्येक योजना निहाय केलेल्या तरतुदीत काही बदल करत ९५ लाख ३८ हजार वाढीव तरतुदीनुसार १ कोटी ८८ लाख ६८ हजार ८०० रुपये सुधारित अंदाजपत्रकास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली .
यामध्ये प्रचार प्रसिद्धी छपाई जाहिराती इत्यादीसाठी संगणक खरेदी ७८ हजार , शेतकऱ्यांचे मेळावे प्रदर्शन ३लाख, कार्यालयीन लेखन साहित्य ३ लाख ६० हजार, पीक संरक्षण औषधे ५ लाख, पीक संरक्षण अवजारावर शेतकऱ्यांना सवलत २० लाख, वनव्यामुळे नुकसान झालेल्या फळबागा व इतर पिकांसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य ८ लाख, सुधारलेल्या शेती अवजारांसाठी अनुदान देणे ५५ लाख, अशाप्रकारे ९५ लाख ३८ हजार रुपयाची वाढीव तरतूद करत सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. तर कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शन आयोजनावर मोठ्या प्रमाणात खर्च करू नये, त्यातून स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नसल्याने यासाठी येणारा सुमारे ५० ते ६० लाख रुपये निधी अन्य कृषी विभागाच्या योजनांवर खर्च करावा. असे ठरविण्यात आले. तसेच जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी सभापती दादा साईल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.









