सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कृषी व पशुसवर्धन विभागमार्फत खा. नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील ७५ युवा शेतकरी निवडून त्यांना कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजनांचा लाभ देऊन त्यांना नव उद्योजक निर्माण करण्याची योजना आज उपाध्यक्ष दादा साईल यांनी सभेत मांडली. तसेच पशु पक्षी मेळाव्याचा ५० लाखांचा निधी या विभागाच्या अन्य योजनेवर वर्ग करण्याचा आणि त्यानिधीतून आधुनिक पशु रुग्णवाहिका खरेदी करण्याचा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समिती सभा सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आज संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बिलोलीकर, समिती सदस्य संतोष पारकर, प्रज्ञा चव्हाण, श्वेता धरणे, शीतल दळवी, पशुसंवर्धन विभागाचे डॉ सुधाकर ठाकूर, डॉ. विद्यानंद देसाई, यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला दिगवंत उपमुख्यमंत्री अजित पवार, गायिका आशा भोसले आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर झालेल्या चर्चेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. यात प्रशासकीय कालावधीत या विभागातील कोणत्याही योजनेवर १०० टक्के खर्च झाला नसल्याची बाब उघड झाली. हे विभागप्रमुखांनी देखील मान्य केले.
आजच्या सभेत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खा. नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढीवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम योजना राबविल्या जात आहेत. त्याच धर्तीवर पशुसंवर्धन विभागामार्फत ७५ तरुण शेतकरी निवडून त्यांना कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजनांचा लाभ देऊन त्यांना कृषी प्रधान करून नव उद्योजक करण्याची योजना आज उपाध्यक्ष दादा साईल यांनी सभेत मांडली. नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिनी या ७५ शेतकऱ्यांची यशोगाथा प्रसिद्ध करून ही योजना पुढेही निरंतर चालू ठेवण्यावर सभेत चर्चा केली. तसेच अशा लाभार्थ्यांची नावे शोधण्याच्या सूचना देताना संबंधित शेतकरी ४० वयोगटातील असतील व ते उपक्रमशील शेतकरी असतील याची खात्री करावी अश्या सूचना यावेळी दिल्या.
पशुमेळाव्याचा निधी अन्य योजनांवर वर्ग
पशु मेळावा आयोजित करण्यास विलंब होत असल्याने तसेच याचा लाभ प्रत्यक्ष स्थानिक शेतकऱ्यांना होताना दिसत नसल्याने योजनेचे फलित दिसून येत नाही . या योजनेवरील ५० लाखांचा निधी अखर्चित राहण्याची शक्यता असल्याने यावर्षी या योजनेवरील निधी वैयक्तिक लाभाच्या योजनांवर खर्च करण्याचा तसेच या निधीतून एक अत्याधुनिक मशनिरी साहित्य असलेली पशु रुग्णवाहिका घेण्याचा ठराव सभेत घेण्यात आला.
एक दिवसा एवजी ४-५ आठवड्यांची पिल्ले द्या
पशु विभागामार्फत एक दिवसीय कुकुटपिल्ले पुरविणे योजनेतर्गत देण्यात येणारी पिल्ले ही एका दिवसाची असल्याने ती वाहतूक करताना आणि येथील वातावरणातील बदलामुळे या पिल्लांचा मृत्यू होतो. परिणामी प्रत्यक्षात शेतकऱ्याकडे कमी पिल्ले राहतात.त्या ऐवजी कुकुट पिलांची संख्या कमी करून एक दिवसाएवजी ४-५ आठवड्यांची पिल्ले उपलब्ध करून द्यावीत असा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला.









