मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगीवे येथे मासे भरलेला कंटेनर पलटी

वाहनचालक किरकोळ जखमी

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगीवे या गावात एका अवघड वळणावर आज पहाटे रत्नागिरी वरून आलेला केरळ च्या दिशेने जाणारा कंटेनर वाहनचालकाचा वाहना वरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी होऊन त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर वाहनचालक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात आज गुरुवार दि. २३ रोजी पहाटे ३.०० वाजता च्या सुमारास घडला असल्याची माहिती स्थानिक गावचे पोलिस पाटील जितेंद्र मण्यार यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की,आर के ट्रेडर्स कर्नाटक यांच्या मालकीचा ALB कंपनीचा असलेला ट्रॅक कंटेनर वाहन क्र.K A 20 /AB – 5350 चालक मंजुनाथ बी पुजारी वय ४६ हा रत्नागिरी येथे मासळी भरून केरळ येथे घेऊन चालला होता. दरम्यान आज पहाटे ३.०० वाजता मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे येथे अवघड वळणावर कंटेनर चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात कंटेनर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाला.यामध्ये चालकाच्या डोक्याला मार बसला असून त्याला पुढील उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान या अपघातग्रस्त कंटेनर मध्ये सुमारे २०० कॅरेट भरलेले ५ टन वजनाची बांगडा, तारळी व अन्य मासळी भरलेली होती. या अपघाताची माहिती समजताच नडगिवे येथील ग्रामस्थानी धाव घेत मदत केली.तर खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी देखील अपघात स्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.तसेच या अपघाताची माहिती समजताच खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे पोलिस अधिकारी मिलिंद देसाई व महामार्ग वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत कासले व मंगेश साटम यांनी अपघात स्थळी तातडीने भेट अपघाताची माहिती जाणून घेतली. “दरम्यान मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगीवे येथील अवघड वळणावर यापूर्वी देखील अनेक अपघात घडले असून यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र महामार्ग प्राधिकरण व संबंधित प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात असून आता तरी महामार्ग प्राधिकरणाने येथील अवघड वळण काढून सदर अपघात प्रवण क्षेत्र अपघात निर्धोक करावे. अशी मागणी स्थानिक जनतेतून व प्रवासी वर्गातून केली जात आहे.”

error: Content is protected !!