मुंबई (प्रतिनिधी): शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर प्रो. विश्वनाथ महाडेश्वर यांचं मंगळवारी निधन झालं. मध्यरात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते. महाडेश्वर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड इथल्या राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल. दुपारी 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा टीचर्स कॉलनी इथल्या स्मशानभूमीच्या दिशेने निघेल.
अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक. उत्तम शिक्षक. शिक्षकांच्या प्रश्नाची जाण असलेला अभ्यासू नगरसेवक. मुंबईचे महापौरपद त्यांनी भूषविले. माझी त्यांना विनम्र श्रद्धांजली’, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महाडेश्वर यांना श्रद्धांजली वाहिली. मार्च 2017 ते नोव्हेंबर 2019 या काळात महाडेश्वर यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं होते. त्याआधी त्यांनी स्थायी समितीत सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषविलेले होते. तसेच महाडेश्वर यांनी 18 वर्षे शिक्षकी पेशा सांभाळला होता. महाडेश्वर उच्चशिक्षित होते. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुसबे गावचे असणाऱ्या महाडेश्वर यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण सिंधुदुर्गातच झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत रुईया महाविद्यालयातून पूर्ण केले. खेळाची आवड असलेले महाडेश्वर यांनी कबड्डीचे कोच म्हणूनही काम केले होते. सांताक्रुझ पूर्व येथील राजे संभाजी विद्यालयात ते मुख्याध्यापक होते. तसेच घाटकोपरच्या पंतनगरमधील तंत्रशिक्षण विद्यालयातही ते इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. 2002 मध्ये त्यांनी राजीनामा देऊन पहिली निवडणूक लढवली होती. 40 वर्षांहून अधिक काळापासून ते शिवसेनेत कार्यरत होते.