फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरात ज्येष्ठ अधिक मासाच्या सांजआरतीचा समारोप सोहळा व महाप्रसाद उदंड उत्साहात—
बालगोपाळ मंडळ, फोंडाघाटचे यशस्वी आयोजन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : १७ मे पासून सुरू झालेल्या, ज्येष्ठ अधिक मासानिमित्त,बालगोपाळ मंडळ, फोंडाघाट आणि श्रीदेव राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने संध्यामहाआरतीचा उपक्रम विशेष उदंड उत्साहात सुरू होता.. यानिमित्ताने पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते. बच्चे कंपनीची उपस्थिती लक्षणीय होती. टाळ- मृदुंगाच्या गजरात सर्वजण तल्लीन होत, “तन मन अर्पून करीतो भावे | तारी हो मजला | माधवा , आरती ही तुजला ss|| रममाण होत होते. आरती नंतर पसायदान, अभंग आणि त्यानंतर विविध स्वादिष्ट आणि पारंपारिक सात्विक प्रसादाची रेलचेल— बालगोपाळांचा आनंद व खट्याळपणा खेळीया कृष्णाच्या लीलांची आठवण करून देत होता…
सुमारे ३२ महिन्यांनी चंद्र आणि सूर्य वर्षाचा मेळ बसविण्यासाठी येणारा अतिरिक्त महिना म्हणजे, अधिक मास ! याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास अथवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात. हा महिना विष्णू आणि श्रीकृष्ण यांना समर्पित असतो. ओम नमो भगवते वासुदेवाय | चा मंत्रोच्चार आणि विष्णू – श्रीकृष्ण आराध्याची सेवा, यामुळे जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद अनुभवता येतो. सध्याच्या राजकीय, सामाजिक व्यवस्थेत हिंदुत्व आणि पारंपारिक रीतीरिवाज यांचा जागर, त्यात अधिकमासाचे महत्त्व यामुळे देशभर सणाप्रमाणे धार्मिक, वैदिक, सनातनी जागरूकता निर्मितीचा प्रयत्न मोठ्या उत्साहाने, स्पर्धेने साजरा केला जातो.
१७ जून रोजी, सायंकाळी सात वाजता मारुती मेस्त्री यांच्या सुश्राव्य भजनी अभंगाने सोहळ्याची सुरुवात झाली.ठीक आठ वाजता तुडुंब भरलेल्या मंदिराच्या सभागृहात बैठ्या पारंपारिक अभंग, श्लोकांनी रंगत आणली. त्यानंतर दैनंदिन महाआरती होऊन पसायदान आणि सर्वांच्या आरोग्य उत्कर्ष, निरामय आरोग्य यांचे सांगणे नटखट श्रीकृष्णाकडे मागण्यात आले. त्यानंतर उशिरापर्यंत हजारो भाविक अबाल- वृद्ध महिला- भगिनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला.महिनाभर एकमेकांच्या भेटीत हास्यविनोद तसेच मनस्वी आराधना महाआरतीत सुरू असलेल्या आनंद सोहळ्याची सांगता हुरहुर लावून गेली.












