दोडामार्ग (प्रतिनिधी): पती-पत्नीच्या भांडणातून निर्माण झालेल्या वादात म्हापसा-गोवा येथील एका माथेफिरूने पूर्वनियोजित कट करून आपल्या मित्राच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून तसेच डोक्यात दगडाने प्रहार करून खून केला. विशीता नाईक (वय ३५, रा. म्हापसा- गोवा) असे तिचे नाव आहे. हा प्रकार काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघड झाला आहे. याप्रकरणी पतीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. विनोद मनोहर नाईक (मुळ रा. वास्को- गोवा सध्या रा. म्हापसा) व ऋतुराज श्रावण इंगवले (मुळ रा. चंदगड-कोल्हापूर सध्या रा. म्हापसा-गोवा) अशी त्यांची नावे आहेत. गेले अनेक दिवस पती-पत्नीत वाद होते. त्यातून हा प्रकार घडला असावा, असा संशय उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या आठ तासात पोलिसांना या खुनाचा छडा लावण्यास यश आले आहे. याबाबत दोडामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाळये येथे एका नाल्यात अनोळखी महिलेचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळून आला. ही घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघड झाली होती. दरम्यान याबाबतची माहिती अज्ञाताने दोडामार्ग पोलिसांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला व चौकशी सुरू करण्यास सुरुवात केली. यावेळी घटनास्थळी मिळालेल्या काही पुराव्यानुसार त्यांनी पतीसह दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी केली असता त्या दोघांनी आपण गुन्हा केल्याची कबुली दिली.
माथेफिरू नवऱ्याने मित्राच्या मदतीने केला पत्नीचा खून












