१५ पैकी १३ जागांवर केला विजय संपादन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीत सत्ताधारी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलने एकतर्फी सत्ता राखली आहे. १५ पैकी १३ जागांवर विजय संपादन केला आहे. तर परिवर्तन पॅनलला केवळ एकच जागा मिळाली असून दोडामार्गमध्ये बंडखोर उमेदवाराने विजय मिळविला आहे. बहुमताने आपले पॅनेल विजयी झाल्याने प्राथमिक शिक्षक पतपेढी परिसरात भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलने विजयोत्सव साजरा केला. गुलाल उधळत तसेच फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी शेकडोंनी शिक्षक उपस्थित होते. यावेळी जोरजोरात घोषणा देण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकार पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे चुरशीचे मतदान झाले होते. २९८२ पैकी २८०६ मतदारांनी मतदान केले होते. ९४.१० टक्के एवढे मतदान झाले आहे. १५ संचालक पदासाठी ३२ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. सत्ताधारी गटाचे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल विरुद्ध परिवर्तन सहकार पॅनेल यांच्यात थेट लढत झाली होती. सकाळी साडे नऊ वाजल्या पासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांच्या निरीक्षणाखाली मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला जिल्हा उमेदवार व तालुका उमेदवार यांच्या मतपत्रिका स्वतंत्र करण्यात आल्या. याला सुमारे दीड तास लागला. यानंतर सव्वा अकरा वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली. सर्वप्रथम आठ तालुका मतदार संघांची मतमोजणी सुरू करण्यात आली. पहिला निकाल वैभववाडी तालुक्याचा लागला. यात सत्ताधारी भाग्यलक्ष्मी पॅनेलने विजय मिळविला. आठ पैकी सहा जागांवर भाग्यलक्ष्मीने बाजी मारली. तर एक जागा परिवर्तनला मिळाली. तसेच एक जागा बंडखोर उमेदवाराने मिळविली.