बांदा (प्रतिनिधी) : दाणोली या जिल्हा मार्गाचे सध्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मे महिन्यापासून सुरू झालेले हे काम सध्या संथगतीने सुरू असल्याने विलवडे हायस्कूल ते विलवडे ग्रामपंचायत पर्यंतचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे.
या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याचा सर्वाधिक त्रास शाळकरी विद्यार्थ्यांसह, ग्रामस्थ महिला आणि वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या धोकादायक जिल्हा मार्गावर कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विलवडे तिठा, वरचीवाडी या ठिकाणी मोठे खड्डे आणि चिखलामुळे पादचाऱ्यांना चालणे देखील धोकादायक बनले आहे. काही ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
त्यामुळे संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन हा जिल्हा मार्ग वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.












