बी.फार्मसीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत…..

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे पडताळणी केंद्र उपलब्ध….

सावंतवा़डी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष – सीईटी सेल मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बी.फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी १९ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेनुसार ऑनलाइन अर्ज नोंदणी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत ३१ जुलै ते १० ऑगस्ट अशी आहे. त्यानंतर ६ ते १२ ऑगस्ट दरम्यान कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चितीकरण करण्यात येणार असून १३ ऑगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. या यादीवरील हरकती १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन सादर करता येणार आहेत.

एमएचटी-सीईटी (पीसीएम व पीसीबी) परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे बी.फार्मसी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रथम वर्ष बी.फार्मसी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. कागदपत्र पडताळणीची सुविधा ई-स्क्रुटिनी तसेच प्रत्यक्ष पडताळणीद्वारे उपलब्ध आहे. प्रत्यक्ष पडताळणीसाठी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे सुविधा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या 9823916005 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!