बांधकाम कामगारांचे प्रलंबित १४,९०५ ऑनलाईन लाभ अर्ज ऑक्टोबर अखेर पर्यंत मंजूर होणार

बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोंदणी करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार

कामगार अधिकारी यांच्यासोबत बांधकाम कामगार महासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची चर्चा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व अन्य ऑनलाईन लाभाचे एकुण अर्ज १४,९०५ एवढे मंजूर करण्यास सुरुवात करण्यात आली असून, लवकरच ते सर्व लाभ अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच ठेकेदार यांच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर नोंदणी करणाऱ्या बोगस कामगारा व संबंधित ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सरकारी कामगार अधिकारी पंकज खांडेकर यांनी सांगितल्याची माहीती बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री भगवान साटम व जिल्हा सचिव श्री हेमंतकुमार परब यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व अन्य लाभाचे ऑनलाईन अर्ज मागील दीड वर्षापासून प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच बांधकाम कामगारांच्या अन्य प्रश्नांबाबत आज सरकारी कामगार अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे बांधकाम कामगार महासंघ जिल्हा पदाधिकाऱ्यां सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण, जिल्हा अध्यक्ष भगवान साटम, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब व जिल्हा कोषाध्यक्ष ओमकार गुरव तसेच दुकाने निरीक्षक रविराज हुंबे, कन्ट्राटी कनिष्ठ लीपीक सुर्यकांत परब हे उपस्थित होते या वेळी प्रलंबित ऑनलाईन लाभ अर्जाबाबत चर्चा करताना कुडाळ – २४१६, कणकवली – ३७४९, मालवण – २३०८, वेंगुर्ले – १६२३, सावंतवाडी – १७८५, देवगड – २६३४, वैभववाडी – ३३४, व दोडामार्ग – ५६ एवढे प्रलंबित आहेत ते तातडीने मंजूर करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली असता, सदर लाभ अर्ज मंजूर करण्यास सुरुवात करण्यात आली असून, सदर लाभ अर्ज ऑक्टोबर २०२६ अखेर पर्यंत मंजूर करून ते मंडळास सादर होतील. याबाबतची तातडीने कारवाई करण्यात येईल असे कामगार अधिकारी पंकज खांडेकर यांनी चर्चेदरम्यान सांगितले

बोगस नोंदणीवर कारवाई होणार
ठेकेदारांच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर बोगस नोंदणी करणाऱ्या कामगार व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले जाईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तालुका सुविधा केंद्रात ओळखपत्र मिळणार! आता कोणत्याही बांधकाम कामगारांना जिल्हा पातळीवर ओळखपत्र घेण्यासाठी जावे लागणार नसून, तालुका सुविधा केंद्रात ओळखपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, बांधकाम कामगारांनी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बांधकाम सुविधा केंद्रात आपली ओळखपत्र स्वतः उपस्थित राहून घ्यावीत असे सांगण्यात आले. खऱ्या कामगार मंडळाच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल व मंडळाचे सर्व लाभ सर्वांना मिळतील याबाबत कारवाई करण्यात येईल असे बांधकाम कामगार महासंघ जिल्हा पदाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेदरम्यान सांगण्यात आल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान साटम व जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली.

error: Content is protected !!