छ.शिवाजी महाराज समाधान शिबिरात सविता आश्रमातील पाच बालकांना अधिवास प्रमाणपत्रांचे वितरण

खारेपाटण (प्रतिनिधी) : कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष स्वरूपात वितरित करण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, शिवसेना नेते संजय आंग्रे, जि.प.उपाध्यक्ष दादा साईल, काका कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार निलेश राणे यांनी मार्गदर्शन करताना सरकार आणि प्रशासन हे लोकाभिमुख असले पाहिजे, असे प्रतिपादन केले. तसेच शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.

या शिबिरात जीवन आनंद संस्थेच्या सविता आश्रम, पणदूर येथील एकल पालक असलेल्या मनोरुग्ण, निराधार मातांच्या पाच बालकांना अधिवास प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रमाणपत्रांमुळे संबंधित बालकांना शासनाच्या विविध शैक्षणिक व सामाजिक कल्याणकारी योजना आणि सुविधांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तसेच या उपक्रमातून संविता आश्रमातील लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल जीवन आनंद संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक आमदार निलेश राणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. जीवन आनंद संस्थेकडून संदिप परब आणि समन्वयक शैलेन्द्र कदम हे देखील यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!