चिंदर गावातील स्वतंत्र तलाठी कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून द्या; पं.स. सदस्य दिपक सुर्वे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावातील तलाठी कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन कणकवली येथे आलेल्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांनी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर उपस्थितत दिले. निवेदनात म्हटले आहे की, चिंदर बाजार तलाठी कार्यालय व सडेवाडी तलाठी कार्यालय ही दोन्ही कार्यालये सध्या भाडेतत्त्वावरील जागेत कार्यरत असून, त्यामुळे कार्यालयीन कामकाज तसेच नागरिकांना महसुली सेवा पुरविताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित तलाठी सजांमध्ये स्वतंत्र कार्यालयीन इमारत उभारण्यासाठी आवश्यक व पुरेशी शासकीय जागा उपलब्ध आहे. तथापि, स्वतंत्र कार्यालयीन इमारतीच्या अभावी महसूल विभागाचे कामकाज मर्यादित जागेत करावे लागत असून, त्याचा शासकीय अभिलेखांचे सुरक्षित जतन, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच कार्यालयीन व्यवस्थापन यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. चिंदर बाजार व सडेवाडी हे महसूलदृष्ट्या महत्त्वाचे तलाठी सजा असल्याने या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र व सुसज्ज तलाठी कार्यालयीन इमारतींची उभारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी आपण आपल्या स्तरावरून उपलब्ध शासकीय जागेवर चिंदर बाजार व सडेवाडी तलाठी कार्यालयांसाठी स्वतंत्र कार्यालयीन इमारती बांधण्यासाठी आवश्यक शासकीय निधी मंजूर करून सकारात्मक कार्यवाही करावी.

सदर मागणी मंजूर झाल्यास परिसरातील नागरिकांना महसुली सेवा अधिक सुलभ, जलद व प्रभावीपणे उपलब्ध होतील. तसेच महसूल प्रशासनाचे कामकाज अधिक कार्यक्षम व सुव्यवस्थितपणे पार पाडता येईल. त्यामुळे स्वतंत्र कार्यालयीन इमारतींच्या बांधकामासाठी आवश्यक निधी मंजूर करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. यावेळी संतोष गांवकर, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, शिशिर पालकर, सागर अपराज, संतोष अपराज आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!