बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील बारावीच्या सहा विद्यार्थ्यांचा निकाल न लावल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. चौधरी यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची भेट घेऊन केली चौकशी

आचरा (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील हुमरठ येथील बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील बारावीच्या सहा विद्यार्थ्यांचा निकाल न लावता तो राखून ठेवण्यात आल्या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी न्याय मिळवून देण्यासाठी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेकडे तक्रार दाखल केली होती. संघटनेच्या वतीने सर्व संबंधित यंत्रणांना या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली होती. संबंधित अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अखेर ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. चौधरी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन यासंपूर्ण प्रकरणाचा अहवाल घेतला.

हुमरठ येथील बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थाचालकांनी यावर्षी बारावीच्या परीक्षेत बसलेल्या सहा विद्यार्थ्यांचा निकाल न लावता त्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याबाबत न्याय मागण्यासाठी सदरच्या सहा विद्यार्थ्यांच्या पालकांनी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर शिक्षणाच्या नावाखाली खोटी आश्वासने देणे, बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसानीस जबाबदार असल्याचे सर्वं पालकांची अशाप्रकारे चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचा अहवाल महत्वाचा मानण्यात येत होता. यासाठी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षासह अन्य पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नुकतेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात जिल्हाधिकारी अन्य अधिकाऱ्यांच्या भेटी देऊन अधिकची माहिती घेण्यात आली.

या विषयासंदर्भात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक यांना यासंबंधीची निवेदने दिलेली होती. त्यानुसार करण्यात आलेल्या चौकशी अहवालावर कणकवली पंचायत समितीच्या सभेमध्ये चर्चा करण्यात आली व संबंधित शाळेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आल्याने सदर शाळेची मान्यता रद्द करण्याबाबतची सूचना करण्यात आली. याबाबतचा अहवाल पंचायत समिती कणकवलीचे गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेला असून पुढील उचित कार्यवाहीसाठी आवश्यक अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला. मात्र एवढे सर्व होऊन सुद्धा अद्याप पर्यंत विद्यार्थ्यांचे झालेल्या शैक्षणिक नुकसानी बाबत बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूल काहीच मार्ग काढत नसल्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेले संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. चौधरी यांनी संस्थाचालकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता राष्ट्रीय अध्यक्षांची देखील भेट नाकारली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी तसेच जिल्ह्यातील अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूल संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराबद्दल तसेच मुलांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान करणाऱ्या शाळेवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, पालक किशोर ठाकरे, कालिदास परब, श्री. सावंत, श्री. देवळेकर आदी पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!