खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर साळीस्ते स्मशान भूमी येथे आज बुधवार दुपारी १२ .३० वाजता च्या सुमारास महामार्गावर उभ्या असलेल्या अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने साळीस्ते रामेश्वर वाडी येथील मोटरसायकल चालक युवक विशाल विजय लिंगायत वय २६ वर्षे याचा डोक्याला गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,मृत युवक हा साळीस्ते पासून जवळ असलेल्या एका पेट्रोल पंपांवर कामावर नुकताच लागला होता.त्याची आई वडील व बहीण हे मुंबई येथे राहतात तर मृत विशाल हा साळीस्ते येथील आपल्या काकाकडे गावी राहत होता.आज नेहमी प्रमाणे तो आपल्या ताब्यातील मोटार सायकल क्र.MH07AW2848 घेऊन कामावर जात असताना साळीस्ते स्मशान भूमी येथे महामार्गावर उभ्या असलेल्या अवजड वाहन क्र.HR61D 1261 पाठीमागून जोरदार धडकला. या अपघातात विशाल याचा जागीच मृत्यू झाला.तर ट्रॅक चालक पुरुषोत्तम उपाध्याय वय ६५ राहणार मध्यप्रदेश,इंदोर हा आपला ट्रक मुंबई वरून आला होता व गोव्याच्या दिशेनं चालला होता. मात्र इंजिन गरम झाल्याने थंड होण्यासाठी त्याने गाडी महामार्गाच्या बाजूला उभी केली होती.अपघात झाल्याचे समजताच तो गाडीतून उतरून मदती साठी आला.मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने विशाल याचा काहीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती जणून घेतली.यावेळी साळीस्ते पोलिस पाटील गोपाल चव्हाण तळेरे पोलिस पाटील चंद्रकांत जाधव उपस्थित होते. दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातात जागीच मृत्यू पावलेला युवक विशाल लिंगायत याला उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे नेण्यात आल्याचे समजते.तर विशाल याचा अपघाती मृत्यू झाल्याने साळीस्ते परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.















