वेदांत काेक कंपनीच्या ओव्हरलाेड वाहतुकीने घेतला निष्पाप बळी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : तालुक्यातील वझरे येथील वेदांत कोक कंपनीकडे गोवा राज्यातून रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या कथित अवैध व ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे आणखी एका निष्पाप प्राण्याचा बळी गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भरधाव ट्रकने एका शेतकऱ्याच्या बैलाला भीषण चिरडले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, या धोकादायक वाहतुकीवर तातडीने पूर्णपणे लगाम घालावा, अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने वेदांत कोक कंपनीकडे कोळसा घेऊन येणारा केए-३७-बी-४०८३ या कर्नाटक पासिंगच्या भरधाव ट्रकने कंपनीच्या गेटसमोर उभ्या असलेल्या गुरांच्या कळपाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एका शेतकऱ्याचा बैल ट्रकखाली तब्बल काही अंतरापर्यंत फरफटत गेला आणि त्याचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला. या अपघातानंतर जमा झालेल्या ग्रामस्थांनी ट्रकचालकासह निष्काळजी यंत्रणेविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत कोक कंपनीसाठी दररोज रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर डंपर आणि १२ चाकी अवजड ट्रक्सद्वारे कोळशाची वाहतूक केली जाते. ही वाहने नियमांचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त माल भरून अत्यंत भरधाव वेगाने हाकली जातात. यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या जीवाला कायमचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रात्रभर होणाऱ्या या धडधडाटामुळे ग्रामस्थांच्या झोपेचाही पुरता खोळंबा होत आहे. ग्रामस्थांनी या वाहतुकीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात आवश्यक असणाऱ्या अधिकृत परवानग्या नसतानाही या वाहनांची सर्रास वाहतूक सुरू आहे. बहुतांश वाहने कर्नाटक राज्यातील असून ती बेकायदेशीररीत्या ओव्हरलोड भरून चालवली जातात. डोळ्यांदेखत हा सगळा प्रकार सुरू असतानाही संबंधित महसूल व वाहतूक यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या या कथित अवैध वाहतुकीला प्रशासनाचा पाठिंबा आहे का, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वारंवार अपघात होऊनही ठोस कारवाई का केली जात नाही, याचे उत्तर जबाबदार अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वझरे व आसपासच्या ग्रामस्थांनी वेदांत कोक कंपनीकडे होणाऱ्या या कोळसा वाहतुकीची उच्चस्तरीय चौकशी करावी, सर्व ओव्हरलोड व परप्रांतीय वाहनांच्या परवानग्यांची कडक तपासणी करून दंडात्मक कारवाई करावी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ही रात्रीची बेकायदेशीर वाहतूक त्वरित बंद करावी, अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने यावर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

error: Content is protected !!