किल्ले भगवंतगडाच्या डिजिटल सर्व्हेला हिरवा कंदील!

ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या संवर्धनाला गती देण्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश; भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या पाठपुराव्याला यश

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या चिंदर गावचा मानबिंदू किल्ले भगवंतगडाच्या संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भगवंतगडाचा डिजिटल सर्व्हे करून त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. त्यामुळे भगवंतगडाच्या संवर्धनाच्या कामाला आता अधिक शास्त्रशुद्ध आणि नियोजनबद्ध गती मिळण्याची अपेक्षा आहे.

राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) उपलब्ध होणाऱ्या ३ टक्के निधीच्या तरतुदीला २०२६-२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निधीतून तसेच विभागीय निधीतून सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले भगवंतगडाच्या संवर्धनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी भगवंतगडाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल सर्व्हे करून गडाची सद्यस्थिती, वास्तूंची रचना व संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर अहवाल तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, किल्ले भगवंतगडाच्या संवर्धनासाठी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला बैठकीतील निर्णयामुळे यश मिळाले असून भगवंतगडाच्या संवर्धनाच्या कामाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बैठकीस भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नांदोस सरपंच विजय निकम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. भगवंतगडाच्या डिजिटल सर्व्हेमुळे गडाच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेले नियोजन अधिक अचूकपणे करता येणार असून ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

error: Content is protected !!