चिंदर ग्रामस्थांचा ग्रामसभेत एकमुखी ठराव; महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावातील वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, अन्यथा गावातील कोणताही ग्राहक वीज बिल भरणार नाही, असा एकमुखी ठराव चिंदर ग्रामसभेत करण्यात आला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी प्रशासक उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी ग्रामसभेत वीज समस्येचा मुद्दा चर्चेला येताच ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले.
गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, विविध तांत्रिक समस्या निर्माण होणे तसेच तक्रारी करूनही संबंधित महावितरण अधिकारी ग्रामस्थांना उपलब्ध होत नसल्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीने महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामसभेस उपस्थित राहण्याचे अधिकृत पत्र देऊनही महावितरणचे अधिकारी उपस्थित राहत नसतील आणि गावातील वीज समस्या पूर्णपणे मार्गी लागत नाही तो पर्यंत ग्रामस्थांनी वीज बिल भरू नये, असा एकमुखी ठराव यावेळी करण्यात आला. त्यामुळे वीज समस्येवरून चिंदर ग्रामस्थांचा संताप आता तीव्र झाल्याचे दिसून आले.
यावेळी दिपक सुर्वे, केदार परुळेकर, राजश्री कोदे, जान्हवी घाडी, सानिका चिंदरकर, संतोष गांवकर, देवेंद्र हडकर, गोपाळ लब्दे, हिमाली अमरे, संतोष अपराज, भूषण पाताडे, आनंद पवार, दिनेश पाताडे, हर्षद बेनाडे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.












