पळसंब पुल ते आचरा बंदर रस्ता खड्डेमय; पावसात केलेली मलमपट्टीही वाहून गेली, झाडीमुळेही धोका
आचरा (विवेक परब) : गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना कणकवली–आचरा मार्गावरील पळसंब पुल ते आचरा तिठा, आचरा बंदर या मार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी आणि खड्डे बुजविण्याच्या नावाखाली करण्यात आलेली निकृष्ट मलमपट्टी यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी व भाविक गावाकडे येणार असताना हा रस्ता अपघातांना निमंत्रण देत असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भरपावसात या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र, पावसाचा जोर वाढताच ही मलमपट्टी अक्षरशः धुऊन गेली असून पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही अशाच प्रकारे मलमपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या नावाखाली केवळ तात्पुरती मलमपट्टी करून शासनाचा पैसा पाण्यात जात आहे का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रस्त्याच्या झाईड पट्टीवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने समोरून येणारी वाहने दिसण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने प्रशासनाने तातडीने रस्त्याची डागडुजी करण्याबरोबरच रस्त्यालगतची झाडी साफ करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची अशीच अवस्था होत असताना कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करणार का, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.












