तालुकास्तरीय शोषखड्डे आणि जलतारा उपक्रमाचाही सभापती रावराणेंच्या हस्ते शुभारंभ
वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुका कृषी विभाग वैभववाडी आणि ग्रामपंचायत सडुरे-शिराळे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या महिला शेतकरी प्रमाणपत्र उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. श्री देव रवळनाथ सभागृहात मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला.
या योजनेअंतर्गत गावातील सुमारे २५० महिलांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित पात्र महिलांनाही लवकरात लवकर लाभ मिळवून देण्याचे नियोजन असल्याचे ग्रामपंचायत सचिवांनी प्रास्ताविकात सांगितले.
कार्यक्रमास पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिद्धेश दिलीप रावराणे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहायक गटविकास अधिकारी स्नेहा माने, लोरे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्या रिद्धी सुतार, पंचायत विस्तार अधिकारी प्रकाश अडुलकर, कृषी विस्तार अधिकारी कांता जाधव, कृषी अधिकारी तिरवडे आणि कृषी सहायक अक्षय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष विठ्ठल काटे यांचीही उपस्थिती होती. मोठ्या संख्येने महिला शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर तालुकास्तरीय शोषखड्डे तसेच जलतारा उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सचिव प्रशांत जाधव यांनी केले.















