देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील तांबळडेग तांबळडेग येथील मच्छीमार पंढरीनाथ सदाशिव सनये हे आपल्या मुलासमवेत मिठबाव येथील गजबादेवी मंदिरानजीक समुद्रात मासेमारी करीत असताना उसळत्या लाटांमध्ये त्यांची नौका बुडाली. सुदैवाने नौकेवरील लाईफ जॅकेटच्या सहाय्याने त्या पितापुत्राने सुखरूप समुद्रकिनारा गाठला. या घटनेत नौकेचे सुमारे ३ लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास घडली.
उपलब्ध माहितीनुसार, तांबळडेग येथील मच्छीमार पंढरीनाथ सनये हे नेहमीप्रमाणे आपली नौका घेऊन मुलगा मंदार याच्यासमवेत शुक्रवारी पहाटे समुद्रात मासेमारी करण्यास गेले होते. मिठबाव येथील गजबादेवी मंदिरानजीकच्या समुद्रीपट्ट्यात ते मासेमारी करीत असताना अचानक आलेल्या मोठ्या उसळत्या लाटांमुळे त्यांची नौका पाण्यात हेलखावे खात बुडू लागली. याचदरम्यान, पंढरीनाथ सनये व त्यांचा मुलगा मंदार याने तात्काळ लाईफजॅकेट घालून पाण्यात उडी घेतली व पोहत समुद्रकिनारा गाठला. या घटनेत नौकेचे इंजिन समुद्रातील खडकावर आदळल्याने मोठे नुकसान झाले. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बुडालेली नौका समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले. नौका, नौकेवरील इंजिन तसेच जांळ्यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.