” एस. टी. ची नाळ तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे.” – उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट

महाराष्ट्राची लोकवाहिनी एस. टी. चा अमृतमहोत्सव कुडाळ येथे संपन्न

केक कापून आणि प्रवाशांना पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा

कुडाळ ( अमोल गोसावी ): सर्वसामान्यांची जीवनवाहिनी तसेच महाराष्ट्राची लोकवाहीनी म्हणून ओळखली जाणारी म्हणजे एस. टी. होय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अमृत महोत्सव दिन सोहळा कुडाळ बस स्थानकात आज विशेष कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. १ जून १९४८ साली एस. टी. महामंडळाची पहिली बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. या प्रवासाला १ जून रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त आज शनिवार दिनांक ३ जून रोजी कुडाळ बस स्थानकात कुडाळ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट आणि माजी नगराध्यक्षा आफरीन करोल तसेच नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एस. टी. चा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांसह काही प्रवाशांचाही पुष्पगुच्छ देउन सन्मान करण्यात आला. यावेळी एस टी महामंडळाचे कणकवली, कुडाळचे सहाय्यक यंत्र अभियंता श्री. संदिप पाटील , वाहतूक निरीक्षक आर. एल. राऊळ , सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्रीमती पी. आर. मोरये, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सुरेंद्र मोरजकर , वाहतूक नियंत्रक एन. एन. आंबेरकर , ए. टी. कुडाळकर , वाहक डी. डी शिरवलकर आदी मान्यवर आणि कुडाळ आगारातील कर्मचारी , प्रवासी उपस्थित होते यानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते एस. टी. चे पूजन करून व एस. टी. ला पुष्पहार घालून आणि केक कापून व प्रवाशांना पेढे वाटून अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी असे प्रतिपादन केले की, कोणत्याही कठीण परिस्थितीत शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना सुखरूप प्रवास आणि सुरक्षित सेवा देण्याच कार्य एस. टी. महामंडळ गेली ७५ वर्षे सातत्याने करते आहे त्यामुळेच एस. टी. ची नाळ तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे. डीझेल दरवाढ , भाडेवाढ , कमी भारमान यासारख्या अनेक समस्यांवर मात करून एस. टी. प्रवाशांना तत्पर सेवा देत आहे. या यशामध्ये एस टी महामंडळाच्या चालक , वाहक आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांचे परिश्रम व योगदान आहे असे सांगून एसटी महामंडळाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर माजी नगराध्यक्षा आफरीन करोल म्हणाल्या की, खेड्यापाड्यातील जनता आरोग्य , शैक्षणिक तसेच इतर कोणत्याही उद्देशाने जर प्रवास करायचा असेल तर सर्वप्रथम एस. टी. लाच प्राधान्य देते. कारण आताच्या युगात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे प्रत्येकाला स्वतःच वाहन वापरण शक्य होत नाही. त्यामुळे एस. टी. ची अविरत सेवा ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी जवळची वाटते. असे सांगून आपली सामाजिक जबाबदारी म्हणून सर्वांनी एसटी नेच प्रवास करावा. असे आवाहनही आफरीन करोल यांनी यावेळी केले. तसेच आतापर्यंत लोकांची एस. टी. महामंडळाबाबत असलेली विश्वासार्हता यापुढेही जपण्याचा आम्ही प्रयत्न करु त्यासाठी प्रवाशांना अपेक्षित असलेले बदल स्विकारून त्यानुसार अंमलबजावणी करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करु असे आश्वासन कुडाळ डेपोचे सहाय्यक यंत्र अभियंता संदिप पाटील यांनी यावेळी बोलताना दिले.

error: Content is protected !!