कोल्हापूर (प्रतिनिधी): समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेट्स ठेवल्यामुळं कोल्हापूर शहरात दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली, त्यामुळं हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज (बुधवार, ता. ७ ) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोल्हापूर शहरात एक हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेट्समुळं काल शहरात तणाव निर्माण झाला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांकडून कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. जमावाने लक्ष्मीपुरी बाजार, सीपीआर चौकासह परिसर, दसरा चौकात प्रार्थनास्थळांवरही दगडफेक केली. कोल्हापुरात काही युवकांनी वादग्रस्त स्टेट्स ठेवलं. त्यामुळं तणाव निर्णाण झाला त्यातून दोन गट आमने-सामने आले. शहरातील दसरा, चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक झाल्याच्या घटना देखील घडल्या. परिणामी, कायदा व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी दाखल झाली .दरम्यान, आज (बुधवार) हिंदुत्ववाद्यांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र जमण्यास प्रशासनानं बंदी केली आहे. जमाव जमवणं, मोर्चे काढणं, सभा घेणं याला प्रशासनानं बंदी घातली आहे. अप्पर जिल्हाधिकारी भगवानराव कांबळे यांनी बंदीचे आदेश काढले आहेत. हा बंद मागे घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं हिंदुत्तवादी संघटनांना केलं आहे. परंतु, ते बंदवर ठाम राहिले आहेत. दरम्यान, आज सकाळपासून शहरातील व्हिनस काॅर्नर परिसरासह अन्य ठिकाणी शुकशुकाट आहे. बस, रिक्षा सुरु आहेत. आज दहा वाजता शिवाजी चौक परिसरात हिंदुत्ववादी संघटना एकत्र येणार आहेत. त्यानंतर बंदची हाक देण्यात येणार आहे, तसंच प्रशासनाबरोबर चर्चा देखील होऊ शकते.













