अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): कणकवली, कुडाळ एसटी स्टँड परिसरात प्रवाशांच्या दागिन्यांसह रोख रक्कमेचीचोरी करणाऱ्या चौकडी चा जामीन अर्ज जिल्हा प्रधान न्यायाधीश संजय भारुका यांनी फेटाळून लावला.याकामी अतिरक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. कणकवली एसटी स्टँड परिसरात 29 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी साक्षी उर्फ बिंदू उर्फ बिंदू अरुण बन्टु, रेखा संतोष टंकाई ( रा. चिकलढणा झोपडपट्टी औरंगाबाद ) सुनील उर्फ हरी संतोष टंकाई , संतोष विक्रम उर्फ कंचा टंकाई ( रा संतोषनगर, मुकुंदवाडी, चिखलढाना औरंगाबाद ) याना अटक करण्यात आली होती.या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे करत आहेत.चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.त्यांनी कणकवली तसेच कुडाळ न्यायालयात जामीन अर्ज सादर केला होता.कणकवली न्यायाधीश सोनटक्के आणि कुडाळ न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे चारही आरोपीनी जिल्हा न्यायालयात जामिनावर मुक्ततेसाठी अर्ज सादर केला होता.आरोपींच्या जामीन अर्जाला जोरदार हरकत घेताना सरकारी अतिरिक्त अभियोक्ता तोडकरी यांनी पुढील मुद्दे जिल्हा प्रधान न्यायाधीश भारुका यांच्यासमोर मांडले.आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. जामीन मिळाल्यास आरोपी पुन्हा गुन्हे करतील. आरोपींकडून 2 लाख 95 हजार 532 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अन्य चोरीचा माल जप्त करायचा आहे. आरोपींवर चोरीच्या प्रकरणात अन्य ठिकाणी खटले सुरू असून जामिनावर मुक्तता झाल्यानंतर आरोपी केस सुनावणीसाठी तेथील न्यायालयात हजर झालेले नाहीत. महिला आरोपी आपले नाव बदलून चोरी करत आहे. आरोपी मागील 3 वर्षांपासून बांदा येथे राहत असून सिंधुदुर्गात चोरी करत आहेत. जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव आणतील त्यांचा सिंधदुर्गात येण्यामागील उद्देशाचा तपास बाकी आहे.आरोपी हे परजिल्ह्यातील असून बांदा येथे भाड्याच्या खोलीत राहत आहेत, त्यामुळे जामीन मिळाल्यास केस सुनावणीसाठी हजर राहणार नाहीत. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राहय धरत जिल्हा प्रधान न्यायाधीश भारुका यांनी चारही आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला.त्यामुळे एसटी बस स्थानकात चोरी करणाऱ्या या चौकडीचा जेलमुक्काम वाढला आहे.












