2 लाखाच्या किंमतीची सोनसाखळी मालकाला केली सुपूर्त
कणकवली (प्रतिनिधी) : बँक ऑफ इंडिया कणकवली शाखेमध्ये 5 जून रोजी बँकेतील आर्म गार्ड श्री सतीश जुवेकर यांना बँक आवारामध्ये एक सोन्याची चैन सापडली. सदर चैन त्यांनी तात्काळ शाखाधिकारी यांच्या ताब्यात दिली. उपस्थित ग्राहकांमध्ये कोणाची चैन हरवली असल्याची चौकशी केली. तर उपस्थित ग्राहकांमध्ये कोणाचीही ती चैन नसल्याचे आढळून आले. शाखाधिकारी श्री रमेश माळी यांनी त्वरित सीसीटीव्ही चेक करून सदरचेन कोणत्या ग्राहकाची आहे याची शहानिशा केली व त्वरित कणकवली पोलीस स्टेशनला कळवण्यात आले. सदर चेन चे वजन केले असता ती 34 ग्रॅम सोन्याची चेन होती तर अंदाजे २,१४,०००/- किमतीची होती. सीसीटीव्ही द्वारे मिळालेल्या फुटेजच्या आधारे बँक कर्मचाऱ्यांनी चेनच्या मालकाला शोधून काढले व त्यांना संपर्क साधून त्यांची चैन परत करण्यात आली. आर्म गार्ड श्री सतीश जुवेकर, हे माजी सैनिक असून कणकवली शाखेमध्ये 2008 पासून कार्यरत आहेत.त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.













