कुडाळ ( अमोल गोसावी ) : सरंबळ येथे कर्ली नदीपात्रात अवैध उत्खननावर कारवाई करणाऱ्या तलाठ्याला शिवीगाळ आणि धमकी देत मारहाण करणे आरोपी नितीन नाईक च्या अंगलट आले असून नितीन नाईक ला एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.याकामी सरकारी वकील मेघा परब यांनी सरकारच्या वतीने काम पाहिले. सरंबळ भाटीवाडी येथे तलाठी किरण सोनावणे हे प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कर्ली खाडीतील अवैध वाळू उत्खननावर आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह कारवाई करत होते. त्यावेळी आरोपी नितीन नाईक ( रा. सरंबळ ) याने तलाठी सोनावणे यांच्या हातातील जप्ती यादी, पंचनामा फाडून टाकला.सोनावणे यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करून धमकी देत मारहाण केली.याबाबत तलाठी सोनावणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नितीन नाईक विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी आरोपी नितीन नाईक याने जिल्हा न्यायालयाकडे केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता.त्यानंतर आरोपी नितीन नाईक ला कुडाळ पोलिसांनी अटक करून आज कुडाळ न्यायालयासमोर हजर केले. या गुन्ह्याच्या तपासकामी आरोपी नितीन नाईक ची पोलिसांनी मागितलेली पोलीस कोठडी मंजूर होण्यासाठी सरकारी वकील मेघा परब यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत कुडाळ न्यायाधीश श्रीमती बाचुलकर यांनी आरोपी नितीन नाईक याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
तलाठ्याला केलेली मारहाण भोवली ; वाळू माफिया नितीन नाईक ची पोलीस कोठडीत रवानगी












