उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ कृतीने दाखवून दिलं आमचं बंड योग्यच !

ब्युरो न्युज (मुंबई ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलं होतं. आता तर थेट वेशीवरच टांगलं आहे, असं ते म्हणालेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी काल विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. पटनामध्ये ही बैठक पार पडली. यात देशातील विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यावरूनच एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही व झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत.

सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे.आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्यच दिसत होते. मोदीजींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येत आहेत. हाच मोदीजींच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल.कालच्या बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या मांडीला मांडी लाऊन बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची आवई उठवून १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!