पुणे (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी या गावचे सुपुत्र व सध्या तळेगाव ढमढेरे (ता . शिरूर ) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. संदीप विठ्ठलराव सांगळे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी यांची निवड झाली आहे.
डॉ. सांगळे कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी या गावचे सुपुत्र असूनसध्या ते तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व प्राध्यापक या पदावर मागील 23 वर्षांपासून कार्यरत आहेत.अभ्यास मंडळाच्या सदस्य पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकी द्वारे डॉ. सांगळे यांची विक्रमी मतांनी निवड झाली होती.
डॉ. सांगळे हे यापूर्वी अभ्यास मंडळावर तीन वेळा निवडून आले आहेत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून सुपरिचित आहेत. कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय व रयत शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल टाकळी खंडेश्वरी या हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी आहेत.
डॉ. सांगळे यांच्या निवडीबद्दल टाकळी खंडेश्वरी गावचे समस्त ग्रामस्थ, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक व शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेशबापू ढमढेरे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले आदींनी डॉ. संदीप सांगळे यांचे अभिनंदन केले आहे. विद्यापीठ अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. सांगळे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. डॉ. संदीप सांगळे हे कर्जत येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेचे संस्थापक मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत.












