खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण टाकेवाडी येथे प्रवासी व नागरिकांच्या सोयीसाठी निवारा शेड अर्थात एस टी बस थांबा शेडच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
या कार्यक्रमाला खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य दक्षता सुतार, मनोहर गोसावी, नारायण मोरे, गणेश सुतार, रमेश मिशाळ,मधुकर लोटनकर, विजय सावंत श्री ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. खारेपाटण जि.प. मतदार संघाचे माजी सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या स्वखर्चातून खारेपाटण टाकेवाडी येथे ही निवारा शेड प्रवाशांच्या सोयीसाठी बांधून देण्यात येत असल्याची माहिती खारेपाटण गावचे उपसरपंच महेंद्र गुरव यांनी दिली.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण टाकेवाडी येथील नागरिकाची बऱ्याच वर्षापासून एस टी बस थांबा निवारा शेडची मागणी होती.अखेर भाजप कार्यकर्ते बाळा जठार यांनी येथील नागरिकांची मागणी मान्य करून स्वनिधितून ही निवारा शेड बांधून देणार आहेत.या निवारा शेडमुळे खारेपाटण टाकेवाडीसह जेधेवाडी, सुतारवाडी, गोसावीवाडी येथील नागरिकांची सोय होणार आहे.














