सिंधुदुर्गात बाळासाहेबांची शिवसेना करणार जंगी स्वागत
मालवण (प्रतिनिधी) : आंगणेवाडी श्री देवी भराडीची यात्रा ४ फेब्रुवारी रोजी होत असून या यात्रेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे मुख्यमंत्री यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे, शंभूराजे देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मालवण येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.
मुख्यमंत्री ना. शिंदे यांचे आंगणेवाडी येथील तसेच जिल्ह्यातील विकासात्मक प्रश्नांबाबत लक्ष वेधले जाणार आहे. मुख्यमंत्री निश्चितच सिंधुदुर्ग साठी भरभरून देतील. असा विश्वास आंग्रे, सावंत यांनी व्यक्त केला.
मालवण चिवला बीच येथे जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हा संघटक नीलम शिंदे, तालुकाप्रमुख महेश राणे, विश्वास गावकर, राजा गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, मालवण महिला तालुकाप्रमुख सोनाली पाटकर, कविता मोंडकर, हर्षद पारकर, कामलाकांत पारक तोडणकर, राजा तोंडवळकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी सुधीर सावंत म्हणाले, मुख्यमंत्री आंगणेवाडी यात्रेस सकाळच्या सत्रात उपस्थित राहणार असून हेलिकॉप्टरद्वारे त्यांचे आगमन होणार आहे. याबाबत आंगणेवाडी येथे भेट देऊन आढावा घेण्यात आला. तसेच आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ मंडळाशी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या आंगणेवाडी भेटीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल असेही ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवीच्या दर्शनानंतर यात्रेतील पक्षाच्या कार्यालयात भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आंगणेवाडी भेटीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासाबाबत तसेच रखडलेले प्रकल्प याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतील, पर्यटनातून येथील जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होईल, देवबाग येथील त्सुनामी आयलंड वाचविण्यासाठी काय करता येईल तसेच किनारपट्टीचे धूप होण्यापासून संरक्षण करणे आदी विविध विषयांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री याबाबत नक्कीच ठोस निर्णय घेऊन आपली भूमिक जाहीर करतील तसेच मुख्यमंत्र्यांची ही भेट जिल्ह्यासाठी लाभदायी ठरेल, असा विश्वासही सुधीर सावंत, संजय आंग्रे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून त्यांचा वाढदिवस आंगणेवाडी येथील बाळासाहेबांची शिवसेना कार्यलयात साजरा केला जाणार आहे. असेही सांगण्यात आले.













