एसटी अपघातातील बांदेकर कुटुंबियांना न्याय द्या ; एसटी चालकावर कठोर कारवाई करा

माजी आम.तथा गाबित समाज महसंघाध्यक्ष जिजी उपरकर यांची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : ८ जुलैला देवगड आगारातून सकाळी ६.२० च्या दरम्याने सुटलेल्या देवगड – वानिवडे बस चालकाने बेदरकारपणे वाहन चालविल्यांमुळे जामसंडे दिर्बादेवी स्टॉप येथे अपघात होऊन देवगड आनंदवाडी येथील तेजस तुषार बांदेकर याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तसेच त्याचा भाऊ तन्मय तुषार बांदेकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे कुटुंबीय आमच्या गाबीत समाजातील असल्याने त्यांना एसटी महामंडळाकडून योग्य तो न्याय मिळावा. अपघातास कारणीभूत कारणीभूत ठरलेल्या बस चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यास योग्य ती शिक्षा व्हावी, अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस, अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी एसटी परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्याकडे केली.

यावेळी गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, देवगड तालुकाध्यक्ष संजय पराडकर, अन्वय प्रभू आदी उपस्थित होते. उपरकर म्हणाले, तेजस बांदकर हा कुटुबियांचा एकमेव कमवता आधार होता त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला एसटी महामंडळामध्ये सेवेत सामावून घेण्यात यावे. तन्मय बांदेकर याचा उपचाराचा पूर्ण खर्च महामंडळाने करावा. शासनाकडून तेजस याच्या मृत्युप्रकरणी नुकसान भरवाईची रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी आवश्यक कादपत्रांची पुर्तता करण्यात यावी. यात पोलीस पंचनामा, ड्रायव्हरच्या तपासणीचे नमुने, वैद्यकीय प्रमाणपत्रे लवकरात लवकर तेजस याच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी उपरकर यांनी केली.

देवगड शहरापासूनचे रस्ते अरूंद असल्याने व दिवसेंदिवस वाहतुक वाढल्याने एसटीसारखी मोठी वाहने कमी वेगात चालविणे, मद्यपान करू नये म्हणून चालकांची तपासणी नियमित करणे या विषयी एसटी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी उपरकर यांनी केली. यावेळी मागणीचे निवेदनही पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तर याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!