गोपुरी आश्रम आणि नशाबंदी मंडळ यांच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रम आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्गच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर महात्मा गांधींच्या जीवनात प्रार्थनेला अतिशय महत्त्वाचे स्थान होते याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, त्यांच्या मते प्रार्थना म्हणजे शरीर आणि मनाचा अविभाज्य भाग आहे. जसे शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाची गरज असते तसेच मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता असते. प्रार्थनेमुळे आपल्यातील दुर्गुण दूर होण्यास मदत होते. त्यामुळे बापूजी आयुष्यभर दिवसातील ठराविक वेळ प्रार्थनेसाठी देत असत. म्हणूनच आपण गांधीजींना सर्वधर्म प्रार्थनेने आदरांजली अर्पण करूया, असे मत व्यक्त केले. गोपुरी आश्रमाचे संचालक बाळु मेस्त्री, सचिव मंगेश नेवगे, व्यवस्थापक सदाशिव राणे तसेच गोपुरी आश्रम परिवार या सर्वांनी प्रार्थनेत सहभागी होऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.













