कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व लोरे वाघेरी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थाध्यक्ष तुळशीदास रावराणे यांचा वाढदिवस विद्यामंदिर हायस्कूल लोरे वाघेरी प्रशालेत विविध शैक्षणिक उपक्रमानी साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे,माजी पं स सभापती मनोज रावराणे, घोणसरी सरपंच मॅक्सी पिंटो, कोंडये माजी सरपंच अण्णा तेंडुलकर, लोरे नं 1 सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव ,अ.रा.विद्यालय वैभववाडी मुख्याध्यापक नादकर सर, भाई राणे संस्था पदाधिकारी प्रकाश रावराणे, अनमोल रावराणे, सुनील रावराणे, अनंत रावराणे, रघुनाथ रावराणे,संतोष कदम. ग्रामसेवक ऋतुराज कदम, सतीश कासले उपस्थित होते.
संस्थेच्या विद्यामंदिर हायस्कूल लोरे- वाघेरी प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत वाटप तुळशीदास रावराणे यांच्या माध्यमातून करण्यात आले.
व्यासपीठावरून बोलताना अनमोल रावराणे यांनी शाळेच्या 23 वर्षाच्या काळात तुळशीदास रावराणे स यांनी घेतलेले कष्ट विषद केले.
नारकर सर तसेच अण्णा तेंडुलकर यांनी एक मार्गदर्शक म्हणून तुळशीदास रावराणे यांच्या असलेल्या कार्याप्रती भावना व्यक्त केल्या.
संतोष कानडे यांनी मनोगत व्यक्त करताना वाढदिवसाचे औचित्य साधत शिक्षणाविषयी असलेली तुळशीदास रावराणे यांची तळमळ व आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले.
मनोज रावराणे यांनी खंबीर मार्गदर्शक म्हणून वडील या नात्याने आणि समाजकारण आणि राहकारणातील धुरंधर व्यक्ती म्हणून रावराणे नेहमीच पाठबळ देतात. त्यांचे विचार, नेतृत्व व दातृत्व गुण आपणासाठी नेहमीच आदर्शवत असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे जयेंद्र रावराणे यांनी आपण यशस्वी होणार यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे आणि मनात जिद्द असली पाहिजे. अशी जिद्द असणारा व चिकाटीने सातत्याने पाठपुरावा करून समाजाच्या हिताचं शैक्षणिक व सामाजिक काम करणार एक मनमिळावू नेतृत्व म्हणजे तुळशीदास रावराणे असा उल्लेख करत गेली 23 वर्ष विनाअनुदान तत्वावर संस्थेच्या माध्यमातून शाळा चालवताना घेतलेले कष्ट व मेहनत याचा उहापोह आपल्या वक्तृत्वातून केला. जिद्दीच्या जोरावर सतत पाठपुरावा करून शाळेला अंशतः अनुदानित केलं. विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासात अशी जिद्द जोपासली पाहिजे व सातत्यपूर्ण अभ्यास करून प्रशालेचे नाव उज्वल केले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
सत्कारपूर्ती तुळशीदास रावराणे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत शुभेच्छा दिल्या त्या सर्व मान्यवरांचे विद्यार्थी, पालक ,ग्रामस्थ यांचे आभार मानले. आपल्या हातून असंच शैक्षणिक व सामाजिक काम होत राहो आणि ते होण्यास आपणा सर्वांच्या शुभेच्छा निश्चितच पाठबळ देणाऱ्या राहोत अशी अपेक्षा व्यक्त केली.













