धामापूर श्री. देव कासारटाक्का महापुरुष देवस्थान परीसराची साफसफाई

सरपंच मानसी परब यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम

चौके (अमोल गोसावी) : धामापूर ग्रामपंचायत सरपंच मानसी परब यांच्या संकल्पनेतुन आज सोमवार दिनांक १७ जुलै रोजी सकाळी श्री देव बैरागी कासारटाक्का महापुरुष देवस्थान परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी धामापूर सडा माळरानाचीही श्रमदानाने साफसफाई करण्यात आली. यामध्ये हजारो दारूच्या बाटल्या , पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स , पत्रावळी , द्रोण , प्लास्टिक पिशव्या यासह अन्य कचरा गोळा करून संपूर्ण माळरान स्वच्छ करण्यात आले. आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत धामापूर सरपंच मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर , ग्रा.प. सदस्य प्रशांत गावडे , तेजस्विनी भोसले , स्वप्निल नाईक , सामाजिक कार्यकर्ते बंड्या राऊळ , महेश धामापूरकर, महेश परब यांच्यासह सिद्धेश परब , दिनेश गावडे , मनिष गावडे, दिनेश ठाकूर , गुरु परब, स्वप्निल सुतार , हर्षदा सुतार आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले व नवसाला पावणारे मालवण कुडाळ मुख्य रस्त्यानजिक धामापूर येथील देवस्थान म्हणजे श्री देव कासारटाक्का बैरागी महापुरुष होय. याठिकाणी पावसाळ्यात बकरा, कोंबड्याचा नवस फेडण्यासाठी भाविक बुधवार , शुक्रवार आणि रविवारी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर दसऱ्यापपर्यंत याठिकाणी नवस फेडणे बंद असते. त्यामुळे आजपासून श्रावण सुरू होत असल्याने काल रविवार दिनांक १६ जुलै रोजी कासारटाक्का येथे नवस फेडण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.

श्री देव बैरागी कासारटाक्क्याचा नवस फेडताना मानवलेला कोंबडा अथवा बकरा त्याच परिसरात शिजवून देवाला नैवेद्य दाखवून तेथेच प्रसाद खाण्याची प्रथा असल्याने येथे येणारे भाविक कासारटाक्का परिसरात ओढ्याच्या काठावर व माळरानावर जागा मिळेल तेथे आडोसा करून जेवण शिजवतात आणि नैवेद्य दाखवून आपल्या सोबत आलेल्या नातेवाईक , सहकारी , मित्रपरिवार यांना प्रसाद भोजन देतात. कासारटाक्क्याला दारु आणि मटणाचा नैवेद्य असल्याने त्यानिमित्त येथे येणारे बहुतेक जण दारु पिवून व चिकन मटण खावून पार्टीसारखाच आनंद लुटतात आणि आपापल्या घरी जातात. मात्र दारूच्या रिकामी बाटल्या , कोल्ड ड्रींक्स व पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या , प्लास्टिक पिशव्या , द्रोण, ग्लास , पत्रावळी आणि इतर कचरा मात्र तिथेच टाकून जातात. काही अतिउत्साही तळीराम मात्र काचेच्या दारुच्या बाटल्या तेथेच फोडून टाकतात. त्यामुळे या परीसरात मात्र प्लास्टिक कचऱ्याचे ढीग असतात आणि टाकलेल्या अन्नामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. या सर्वाचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो.

याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे धामापूर गावातील शेतकऱ्यांची गुरे चरण्यासाठी दररोज याच माळरानावर येतात. त्यांच्या पायाला दारुच्या बाटल्यांच्या काचा लागून जायबंदी होतात तसेच ही जनावरे जेवणाच्या वासाने परिसरातील पत्रावळी आणि प्लास्टिक पिशव्या खातात आणि आजारी पडून मृत्युमुखी पडतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. म्हणून येथे येणाऱ्या भाविकांनी आपण टाकलेला कचरा स्वतः नेवून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असते परंतु प्रत्यक्षात तसे कोणी करत नाही. त्यामुळे ही कचऱ्याची समस्या दरवर्षीच निर्माण होते. आणि धामापूरच्या निसर्ग सौंदर्यात बाधा निर्माण होते.
यावर्षी मात्र धामापूर गावच्या विद्यमान सरपंच सौ. मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर, तसेच देवस्थानचे मानकरी बंड्या राऊळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि काही ग्रामस्थांनी एकत्र येत आज कासारटाक्का माळरानावर साफसफाई मोहीम राबवून संपूर्ण परीसर स्वच्छ केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!