विशेष जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी सुनावली शिक्षा
सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अनैतिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने एका अल्पवयीन शाळकरी मुलीला फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी आरोपी विशाल निलेश मोडक (२२) रा. शिवाजीनगर कणकवली, मूळ रा. बोर्डवे बागवेवडी याला दोषी ठरवत येथील विशेष न्यायाधीश एस जे भारुका यांनी ३ वर्षे कारावास आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर याच प्रकरणातील संशयित विकास उर्फ विकी विजय धुरी रा. कासार्डे याची निर्दोष मुक्तता केली आहे.
विशाल मोडक आणि विकास धुरी यांनी १९ मार्च २०२० रोजी अनैतिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने तालुक्यातील एका शाळकरी मुलीला फुस लावून पळवून नेले होते. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात विशाल आणि विकास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, पिडीतेचे वडील आणि तिची प्रत्यक्षदर्शी मैत्रीण यांनी साक्ष महत्वाची ठरली. साक्षीदारांची साक्ष आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपी विशाल मोडक याला न्यायालयाने भादवी कलम ३५४ अ (i)(ii) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ अंतर्गत दोषी ठरवत ३ वर्षे कारावास आणि १००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच या तील दुसरा संशयित आरोपी विकास धुरी याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.












