युवासेना उपविभागप्रमुख वैभव सरंबळकर आणि युवासेना शाखाप्रमुख संतोष राणे यांचे टीकास्त्र
कुडाळ,(अमोल गोसावी) : अळंबी उगवतात तसे कधीतरी रणजीत देसाई उगवतात. त्यामुळे जि. प. सदस्य म्हणून काम केलेल्या देसाई यांनी वराती मागून घोडे नाचू नये काम करून दाखवावे. विनाकारण जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू नये, आपण काय बोलतो आपण काय करतो याची थोडी आठवण ठेवावी. सरबंळ देऊळवाडी येथील डोंगर खचण्याचा प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या रहिवाशांना जीव धोक्यात घालून राहावे लागते. कधी डोंगर पडेल याची टांगती तलवार असते. दोन वर्षांपूर्वी डोंगर खचला काही घरांचे नुकसान झाले. त्यावेळी रणजीत देसाई हे जि. प. उपाध्यक्ष होते. या भागाचे ते सदस्य होते. त्यावेळी त्यांनी संरक्षक भिंत बांधून देतो असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले हे आधी त्यांनी सांगावे आणि नंतर वराती मागून घोडे नाचवावे.
आता पुन्हा डोंगराची माती रस्त्यावर आली आणि पाहणी करण्याची स्टंटबाजी करण्यासाठी वर्षभरानंतर देसाई गावात आले. वर्षभरात या भागासाठी त्यांनी काय केले, याचे उत्तर ते देतील का ? आज पुन्हा एकदा त्यांनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून स्थानिक ग्रामस्थांची फसवणूक करण्याचा प्रकार केला आहे. देसाई तुम्ही आधी मागील जे आश्वासन दिले त्याची पूर्तता करा, विनाकारण स्थानिक लोकांना वेठीस धरून नौटंकी करू नका, असे टीकास्त्र नेरुर युवासेना उपविभागप्रमुख वैभव सरंबळकर आणि युवासेना शाखाप्रमुख संतोष राणे यांनी सोडले आहे.