हळवल गावासाठी स्वतंत्र वायरमन देण्याची केली मागणी !
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वीज समस्येने नेहेमीच विळख्यात सापडलेल्या हळवल गावातील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली होती. दरम्यान त्यावेळी पावसापूर्वी हळवल गावातील वीज वाहिन्या तसेच मोडखळीस आलेले विद्यतु पोल तात्काळ दुरुस्त करून देण्याच आश्वासन कार्यकारी अभियंत्यानी दिले होते. मात्र त्या आश्वासनापलीकडे जाऊन हळवल गावाला ऐन पावसाळ्याच्या दिवसात वायरमन नसल्याने विजेची समस्या निर्माण झाली. याबाबत ग्रामस्थांनी एकत्र येत महावितरणचे कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना निवेदन दिले.
दरम्यान यावेळी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हळवल गावामध्ये सद्यस्थितीत वायरमन नसल्यामुळे पावसाळ्याचे दिवस असल्याने हळवल गावातील ग्रामस्थांना लाईट जाणे व विद्युत पुरवठा खंडित होणे तसेच विद्युत लाईनवर आलेली झाडे तोडली नसल्यामुळे ती वादळाच्या वेळी पुन्हा पुन्हा लाईटच्या लाईनवर पडत असल्याने वीज पुरवठा खंडीत होतो. सदरची समस्या तात्काळ दूर करावे. गावासाठी नवीन स्वतंत्र वायरमन देण्यात यावा, अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी उपसरपंच सान्वी गावडे, माजी उपसरपंच प्रदीप गावडे, माजी सरपंच संतोष गुरव, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाकूर, भरत गावडे, लवू परब, शिवा राणे, सुदर्शन राणे आदी उपस्थित होते.