सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 27 जुलै 2023 रोजी व्यवसायाचा टप्पा 5000 कोटींवर नेला आहे त्यामुळे ही जिल्हा बँक कोकण विभागात अव्वल ठरली आहे. तर गत आर्थिक वर्षात ठेवींचा दर 7.39 टक्के वाढल्याने ठेवींमध्ये सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्र राज्यात तिसरी ठरली आहे. अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयामधील अध्यक्ष दालनात शुक्रवारी दुपारी दळवी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करत याबाबत माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, ऍड प्रकाश बोडस आदी उपस्थित होते. पाच हजार व्यवसाय टप्पा गाठण्याचे जिल्हा बँकेने मिळविलेले हे यश ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, सभासद, शेतकरी यांच्या माध्यमातून मिळविले आहे. यासाठी संचालक व अधिकारी, कर्मचारी यांचे योगदान आहे. या सर्वांचे आपण विशेष अभिनंदन करतो, असे यावेळी दळवी यांनी सांगितले.