समुहाचे संस्थापक सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत करण्यात आला सत्कार
वैभववाडी (प्रतिनिधी) :तिमिरातुनी तेजाकडे ही महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी एकमेव शैक्षणिक चळवळ स्वरुपात प्रसिद्ध असून विविध शैक्षणिक संकुलात, विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संदर्भात अविरतपणे सामाजिक कार्य सुरू आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत व पारदर्शक प्रशासनाचा भाग बनावे यासाठी विविध माध्यमातून निःशुल्क मार्गदर्शन प्रदान केले जाते. तिमिरातुनी तेजाकडे या समुहातील विद्यार्थीनी, प्रतिक्षा संतोष भदाणे यांची वर्ष २०२२ मध्ये झालेल्या भारतीय नौदलाच्या परीक्षेत अंदमान निकोबार या विभागासाठी ट्रेडसमन स्कील्ड मेकॅनिक (डिझेल) या तांत्रिक पदावर निवड झाली. आयटीआय मध्ये डिझेल मेकॅनिक या ट्रेडमध्ये त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर बीएची पदवी सुद्धा संपादित केली. अविरतपणे प्रयत्न करताना अपयश सुद्धा प्राप्त झाले परंतु जिद्द व चिकाटी बाळगून त्यांची भारतीय नौदलात निवड झाली. त्याबद्दल प्रख्यात प्रेरणादायी व्याख्याते, उच्चविद्याविभूषित सिंधूपुत्र व भारत सरकारच्या मुंबई सीमाशुल्क विभागात सेवेत असणारे अनुवाद अधिकारी, सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत यशस्वी विद्यार्थिनीच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. भिवंडी येथील अत्यंत सामान्य कुटुंबात वाढलेली ही विद्यार्थिनी असून स्वयंअध्ययनाने तिने हे यश संपादन केले. “महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण व्हावे व आपल्या विचारांच्या कक्षा रुंदवाव्या, जेणेकरून अंदमान सारख्या बेटावर सुद्धा देश सेवा करण्यासाठी अशा प्रकारे शासकीय नोकरीच्या माध्यमातून करियर करता येते. हे उदाहरण असंख्य महिलांना प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी केले.