तळेरे (प्रतिनिधी): कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या सन -१९९० -९२बॅचचे माजी विद्यार्थी ‘याराना मित्र परिवार’ ग्रुपने नुकतीच आपल्या शाळेला सदिच्छा भेट देऊन आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद घेतला.
छोटेखानी आयोजित कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर,सल्लागार प्रभाकर कुडतरकर, पदाधिकारी रवींद्र पाताडे,दिपक गायकवाड, प्राचार्य एम.डी.खाड्ये आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ‘याराना मित्रवारातील उपस्थित काही सदस्यांनी शाळेप्रति असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करताना, आमच्या गुरूजनांच्या आणि शाळेच्या उपकारातून कधीच उतराई होवू शकत नाही अशी आदरयुक्त भावना व्यक्त केली. तसेच पुढील भेटीत शाळेसाठी यथाशक्ती मदत करण्याची इच्छाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांमधून शाळेप्रति असलेली आपुलकी असणे हीच मोठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन प्रभाकर कुतरकर यांनी केले.तर संजय पाताडे यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीत माजी विद्यार्थी वर्गाचा वाटाही मोठा असल्याचे सांगून शाळेच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या संपर्कात राहावे असे आवाहन केले.
याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी ‘याराना मित्र परिवाराच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच लवकरच पुन्हा शाळेला भेट देणार असल्याचे अभिवचन देत सदिच्छा भेटीची सांगता केली.