३० जुलै रोजी कुडाळ येथे होणार पुरस्काराचे वितरण
कुडाळ ( अमोल गोसावी ) : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ चा प्राथमिक विभागातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा पांग्रड रेडेतळ शाळेचे शिक्षक श्री. अमोल तुकाराम गोसावी यांना जाहीर करण्यात आला आहे.
युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने दरवर्षी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील प्राथमिक शिक्षकांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित असून युवा संदेश प्रतिष्ठानच्या तज्ञ कमिटीमार्फत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता शालेय विद्यार्थी , पालक , शालेय परीसरातील ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करुन आदर्श शिक्षकांची निवड करण्यात येते. त्यानुसार सन २०२३ चा प्राथमिक विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री अमोल तुकाराम गोसावी यांना तर माध्यमिक विभागाचा पुरस्कार, एस एल देसाई विद्यालय पाट चे शिक्षक श्री सदगुरू नारायण साटेलकर यांना जाहीर झाला आहे.
युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्याचे हे सातवे वर्ष असून शाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. हा प्रतिष्ठेचा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक श्री अमोल गोसावी आणि श्री सदगुरू साटेलकर यांचे माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत आणि युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल दोन्ही शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.












