सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ईश्वरी चिठ्ठीने तब्बल दोन संचालक निवडून आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला सत्ता मिळविता आली आहे. जिल्हा बँक प्रमाणे विठ्ठल देसाई यांना पुन्हा एकदा ईश्वरी चिठ्ठीने साथ दिली. राजेंद्र प्रभुदेसाई यांनाही चिठ्ठीने साथ दिली. त्यामुळे १३ पैकी सात संचालक भाजपचे तर सहा संचालक महा विकास आघाडीचे निवडून आले आहेत. मात्र, भाजप पॅनल प्रमुख तथा जिल्हा बँक संचालक गजानन गावडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृहात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी मतदार म्हणून १२७ संस्था मतदार निश्चित झाले होते. सर्व मतदारांनी मतदान केल्याने १०० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपचे सात तर महाविकास आघाडीचे सहा संचालक निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उर्मिला यादव यांनी काम पाहिले. त्यांना श्रीकृष्ण मयेकर, व्ही एम आरेकर, प्रशांत साळगावकर, सुमती ढवण, नंदिनी सामंत, विलास सावंत, ओमकार यादव यांनी काम पाहिले.












